पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून नवोदित मराठी अभिनेत्रीवर बलात्कार ; आमदार पुत्र मुलावर गुन्हा दाखल
पुणे – लग्नाचे आमिष दाखवून ३२ वर्षीय अभिनेत्रीवर बलात्कार केल्या प्रकरणी पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने बलात्कार केल्याचा आणि डोक्याला पिस्टल लावून धमकी दिल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात विराज रविकांत पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीने २६ जानेवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मॉडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटात काम केले आहे. अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. सोशल मीडियातून तिची विराज पाटीलशी ओळख झाली होती. दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते. मात्र त्यानंतर त्याने लग्नाबाबत विचारले असता तरुणीला धमकावले.आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दिले होते. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपी पीडित तरुणीला टाळू लागला. त्यामुळे फिर्यादी तरुणीने विराजकडे याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. मला घरच्यांना का भेटवत नाही अशी विचारणा तरुणीने विराजला केली होती. त्यावर विराज पाटीलने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर जवळ असलेली पिस्टल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तू जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो मी कोण आहे, अशी धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे
*पुण्यात मुली असुरक्षित?*
शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी आणि आता कॉस्मोपॉलीटियन सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचं पाहायला मिळालं, मात्र यातही बलात्काराची आकडेवारी पाहिली तर अनेकांच्या भुवया उंचावणार आहे. पुण्यात मागील तीन वर्षात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यंदा २०२३ मध्ये तब्बल ३९४ बलात्काराचे गुन्हे समोर आले आहेत. ही आकडेवारी पाहून पुण्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येतं.