वाहनांच्या भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे जागीच ठार
परभणी : पोखर्णी – पाथरी मार्गावरील भारसवाडाजवळ चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहन जळून खाक झाले. यात प्रभाकर मारोतराव गवारे (५६, रा. पाथरी) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
चार चाकी वाहनातील प्रवासी आग लागण्याअगोदरच घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. बंदखडके, बळीराम मुंडे, विठ्ठल कुकडे यांनी घटनास्थळी गाव घेत मयत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगितले. अपघात इतका भीषण होता की काही क्षणात दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे २०१९ साली सोनपेठ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले होते. काही महिन्यापूर्वी त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.