तळोजा येथील कारखान्यात कोट्यावधी किंमतीचे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस केले नष्ट

Spread the love

तळोजा येथील कारखान्यात कोट्यावधी किंमतीचे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस केले नष्ट

मुंबई – मुंबई सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने तळोजा येथे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस यासारखे अंमली आणि मनावर परिणाम करणारे नशा आणणारे ५४.८५० किलो पदार्थ (एनडीपीएस), नष्ट केले. अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम, मुंबई सीमाशुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या मुंबई सीमाशुल्क क्षेत्र, सीबीआयसीच्या उच्चस्तरीय अंमली पदार्थ नष्ट समितीसमोर राबवण्यात आली.

नवी मुंबईतील तळोजा येथील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा (सीएचडब्लूटीएसडीएफ), एमडब्ल्यूएमएल येथे हे अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अवैध बाजारपेठेतील किंमत सुमारे ४१० कोटी रुपये आहे. या वर्षभरात अंमली पदार्थ नष्ट करण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा २ मार्च २०२३ रोजी अंदाजे २४० कोटी रुपये किंमतीचे ६१.५८५ किलो आणि १९ जुलै २०२३ रोजी दुसऱ्यांदा अवैध बाजारात ८६५ कोटी रुपये किंमतेचे १२८.४७ किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अशा प्रकारे, या वर्षात १५१५ कोटी रुपये किंमतीचे एकूण २४४.९०५ किलो अंमली पदार्थ नष्ट  करण्यात आले. विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (एसआयआयबी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांसारख्या विविध संस्थांनी हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon