मंत्रालयात खळबळ; मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून ८० हजारांची चोरी?

मंत्रालयात खळबळ; मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून ८० हजारांची चोरी?

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना नेते व मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून तब्बल ८० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या घटनेमुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात ठेवण्यात आलेली रोख रक्कम अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कार्यालयातील कर्मचारी तसेच विविध विभागांत ये-जा करणाऱ्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी आणि झाडाझडती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मंत्रालयात १० हजार रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम घेऊन जाण्यावर निर्बंध असल्याचे नियम आहेत. अशा परिस्थितीत संबंधित कार्यालयात तब्बल ८० हजार रुपये आलेच कसे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे मंत्रालयातील आर्थिक व्यवहार आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही बाब बाहेर येऊ नये तसेच चोरीची वाच्यता टाळण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आल्याच्याही चर्चा मंत्रालयीन वर्तुळात सुरू आहेत. मात्र, याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, तसेच चोरीमागील नेमके कारण काय, याबाबत स्पष्टता झालेली नाही. मात्र, मंत्रालयासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी घडलेल्या या कथित चोरीमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon