नाशिकमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड; अघोरी पूजेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, दोन एकर जमीनही बळकावल्याचा आरोप

नाशिकमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड; अघोरी पूजेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, दोन एकर जमीनही बळकावल्याचा आरोप

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक : अघोरी पूजा, दैवी शक्ती आणि मृत्यूयोगाची भीती दाखवत दोन भावांची आर्थिक फसवणूक करून त्यांची दोन एकर शेतजमीन बळकावल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोंदूबाबा कमलेश अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हस्तक्षेपानंतर हा प्रकार समोर आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर या भावांच्या आई-वडिलांचे २०२१ मध्ये निधन झाले होते. या धक्क्यातून सावरत नसलेल्या दोन्ही भावांनी आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या शोधात यूट्यूबवरून कमलेश अधिकारी याच्याशी संपर्क साधला होता. नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरात आश्रम चालवणाऱ्या या भोंदूबाबाने त्यांच्या मानसिक अवस्थेचा फायदा घेतल्याचा आरोप आहे.

“तुमच्या कुटुंबावर मागील जन्माचे पाप आहे, जमिनीत दैवी दोष असून अतृप्त आत्म्यांमुळेच आई-वडिलांचा मृत्यू झाला,” अशी भीती दाखवत आरोपीने दोन्ही भावांना आपल्या प्रभावाखाली घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्यांना मध्यप्रदेशातील उज्जैन येथे नेण्यात आले. तेथील स्मशानभूमीत चार दिवस अघोरी पूजा करण्यात आली. या पूजेदरम्यान पशूंचा बळी देण्यात आल्याचा आरोप असून, त्यासाठी सुमारे दीड लाख रुपये उकळण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमातही अघोरी पूजा करण्यात आली. पीडितांना दारू ‘प्रसाद’ म्हणून देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात दोन्ही भावांना बळजबरीने डांबून ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडून घरगुती कामे करून घेत विविध प्रकारे शोषण करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, स्वतःचा मठ उभारण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने आरोपीने देवकर बंधूंची दोन एकर शेतजमीन फसवणूक करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण व्यवहारात आरोपीच्या पत्नीचीही भूमिका असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणानंतर पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अंनिसच्या मदतीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी फसवणूक आणि जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ आणि पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या भोंदूबाबाने अशाच प्रकारे इतरांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, संबंधितांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon