प्रेमाच्या आमिषाने १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; सराईत भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
महेंद्र (अण्णा) पंडित / प्रतिनिधी
डोंबिवली : सोशल मीडियावरून तरुणींशी ओळख वाढवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्या नावावर लाखो रुपयांची कर्जे काढून फसवणूक करणाऱ्या एका सराईत भामट्याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदर्श म्हात्रे असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात अनेक तरुणींनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकारामुळे डोंबिवली आणि पनवेल परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल परिसरात राहणारा आदर्श म्हात्रे हा सोशल मीडियावरील विविध माध्यमांतून तरुणींशी संपर्क साधत असे. सुरुवातीला गोड बोलून मैत्री करणे, त्यानंतर विश्वास संपादन करून प्रेमसंबंध निर्माण करणे, असा त्याचा ठरलेला पद्धतशीर डाव होता. संबंधित तरुणी पूर्णपणे विश्वासात आल्यानंतर त्यांच्या नावावर विविध बँकांतून लाखो रुपयांची कर्जे काढून तो फसवणूक करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या आरोपीला यापूर्वी नवी मुंबई पोलीस यांनी अटक केली होती. मात्र, डोंबिवलीतील एका पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर मानपाडा पोलीस स्टेशन पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक तपासात आदर्श म्हात्रे याने तब्बल १४० हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी ११ महिलांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात अधिकृत गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू असून आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्चशिक्षित असून त्या आर्थिक, कॉर्पोरेट आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना लक्ष्य करून त्यांच्याशी विश्वासाचे संबंध निर्माण करण्याची आरोपीची पद्धत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आरोपीविरोधात आणखी काही पीडित महिला पुढे येण्याची शक्यता असून फसवणुकीचा आकडा आणि आर्थिक व्यवहारांची व्याप्ती आणखी वाढू शकते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील ओळखी आणि ऑनलाईन नातेसंबंधांबाबत पुन्हा एकदा सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.