जनगणना पार्श्वभूमीवर सरकारी बदल्यांना मुदतवाढ; सावंतवाडी स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते’ नाव
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आगामी ‘जनगणना २०२७’च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. मधू दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात केल्या जातात. मात्र, यंदा ‘जनगणना २०२७’ अंतर्गत घरगणना आणि घरयादी तयार करण्याचे काम १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे. या राष्ट्रीय कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळाव्यात, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने बदल्यांची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयासाठी ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५’मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाने संबंधित मसुद्यास मंजुरी दिली असून, याबाबतचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेनंतर लवकरच जारी केला जाणार आहे. या निर्णयामुळे जनगणनेच्या कामात कोणताही प्रशासकीय अडथळा निर्माण होणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा ठरणारा आणखी एक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला स्व. मधु दंडवते यांचे नाव देण्यास मंजुरी देण्यात आली असून, केंद्र सरकारची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर या स्थानकाचे अधिकृत नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यात येणार आहे.
स्व. मधु दंडवते यांनी रेल्वेमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री म्हणून कार्यरत असताना कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. कोकण रेल्वे साकारण्यात त्यांच्या योगदानाची दखल घेत अनेक वर्षांपासून सावंतवाडी स्थानकाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात येत होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणवासीयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.