कल्याणमध्ये धक्कादायक घटना : जन्मदात्या वडिलांकडून विवाहित लेकीची हत्या; आरोपी फरार
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : राज्यात कौटुंबिक वाद आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना कल्याण पश्चिम परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या विवाहित मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गायत्री शिंदे असे मृत तरुणीचे नाव असून विनोद वसईकर असे आरोपी वडिलांचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईकर कुटुंब कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहत आहे. विनोद वसईकर हे खासगी काम करत असून त्यांच्या पत्नी आणि मुलगा नोकरीला आहेत. गायत्री शिंदे हिचा विवाह नोव्हेंबर २०२५ मध्ये झाला होता. काही दिवसांपूर्वी ती माहेरी आली होती.
विशेष म्हणजे, घटनेच्या आदल्या दिवशी रविवारी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यामुळे घरात कोणताही तणाव असल्याचे बाहेरून दिसून येत नव्हते. सोमवारी दुपारी गायत्रीने आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी घरात ती आणि तिचे वडील दोघेच असल्याचे तिने सांगितले होते.
सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर तिच्या आईने घराचा दरवाजा उघडला असता गायत्री रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत पडलेली दिसली. तिला तत्काळ तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर आईने तातडीने मुलगा आणि पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता महत्त्वाचे धागेदोरे समोर आले. सकाळी विनोद वसईकर हे नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते. मात्र काही वेळानंतर ते पुन्हा घरी परतल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास ते घाईघाईने इमारतीतून बाहेर पडताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत.
या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आहेत. मुलीची हत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतरच या हत्येमागील कारण समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.