जिद्दीने गाठला एव्हरेस्ट बेस कॅम्प; कल्याणच्या नयना बोऱ्हाडे यांची प्रेरणादायी कामगिरी

जिद्दीने गाठला एव्हरेस्ट बेस कॅम्प; कल्याणच्या नयना बोऱ्हाडे यांची प्रेरणादायी कामगिरी

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : वयाच्या पन्नाशीतही जिद्द, चिकाटी आणि फिटनेसच्या जोरावर अशक्य वाटणारी स्वप्ने पूर्ण करता येतात, हे कल्याण पूर्व येथील लोकग्राम परिसरात राहणाऱ्या गृहिणी तसेच अल्ट्रा सायकलिस्ट आणि धावपटू नयना बोऱ्हाडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. हिमालयातील समुद्रसपाटीपासून तब्बल १७ हजार ५९८ फूट उंचीवर असलेल्या ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’पर्यंत यशस्वी चढाई करत त्यांनी एक प्रेरणादायी विक्रम नोंदवला आहे.

एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक हा जगातील अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक ट्रेकपैकी एक मानला जातो. कमी ऑक्सिजन, प्रतिकूल हवामान, गोठवणारी थंडी आणि उंचावरील दाब अशा अनेक अडचणींवर मात करत नयना बोऱ्हाडे यांनी हा प्रवास पूर्ण केला. विशेष म्हणजे, गृहिणीची जबाबदारी सांभाळत त्यांनी फिटनेस आणि साहसी क्रीडा क्षेत्रात सातत्याने स्वतःला सिद्ध केले आहे.

अल्ट्रा सायकलिंग आणि धावण्याची आवड जोपासताना त्यांनी नियमित सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि मानसिक तयारीच्या बळावर एव्हरेस्ट बेस कॅम्पचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या या कामगिरीमुळे कल्याण परिसरातील महिला आणि तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

नयना बोऱ्हाडे यांच्या या यशाबद्दल लोकग्राम परिसरासह कल्याण शहरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशाने “वय हे केवळ एक आकडे असते” हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon