‘शिवाचा अवतार’ सांगत कोट्यवधींची फसवणूक; अशोक खरात ईडीच्या जाळ्यात, १४ कोटींची रोकड जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : स्वतःला भगवान शिवाचा अवतार असल्याचे सांगून भाविकांची फसवणूक करणाऱ्या आणि ब्लॅकमेलद्वारे कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या नाशिकच्या अशोक खरात याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने खरातला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झालेल्या या कारवाईत ईडीने तब्बल १३.९२ कोटी रुपयांची रोकड, मर्सिडीज कार, किलोभर सोन्यासह मोठी संपत्ती जप्त केली आहे.
अशोक खरातविरोधात महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, तसेच व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळल्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली. ईडीच्या तपासात खरातने अघोरी प्रथा, काळी जादू आणि मृत्यूची भीती दाखवून लोकांना जाळ्यात ओढल्याचे उघड झाले आहे. आध्यात्मिक उपचार आणि दिव्य शक्तींच्या नावाखाली त्याने अनेकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान एका तक्रारदाराकडून खरातने तब्बल ५.६२ कोटी रुपये उकळल्याचे समोर आले. या पैशांतून त्याने महागडी मर्सिडीज कार खरेदी केली, परदेश दौरे केले, अमेरिकेत उपचार घेतले आणि फार्महाऊस उभारल्याचे ईडीने म्हटले आहे.
छाप्यांत रोकड, दागिने आणि मालमत्तेचे दस्तऐवज जप्त
१३ एप्रिल ते १८ मे दरम्यान ईडीने खरात आणि त्याच्या साथीदारांच्या निवासस्थानांवर, कार्यालयांवर तसेच बँक लॉकरवर छापे टाकले. या कारवाईत १३.९२ कोटी रुपयांची रोकड, ५,५०० अमेरिकन डॉलर्स, सुमारे १.१२ कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, २.२५ कोटी रुपयांच्या मुदतठेवी, महागडी मर्सिडीज कार, डिजिटल उपकरणे आणि बेनामी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली.
बनावट खात्यांद्वारे काळा पैसा पांढरा
गुन्ह्यातून मिळालेला पैसा वैध दाखवण्यासाठी खरातने विविध पतसंस्था आणि बँकांमध्ये बनावट खाती उघडल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित खातेदारांना याची कल्पनाही नसताना त्यांच्या नावाने व्यवहार करण्यात येत होते. मोठ्या प्रमाणात रोकड जमा करून ती मुदतठेवींमध्ये रूपांतरित केली जात होती आणि नंतर पुन्हा रोख स्वरूपात काढली जात होती. या सर्व व्यवहारांवर खरातचे मोबाईल क्रमांकाद्वारे नियंत्रण असल्याचे ईडीने नमूद केले.
या प्रकरणात ईडीने यापूर्वी रूपाली चाकणकर यांचीही चौकशी केली आहे. खरातच्या बँक लॉकरमधील सोने, परदेशी चलन, आलिशान गाड्या, बंगले आणि फार्महाऊस खरेदीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.