‘कॉक्रोच जनता पार्टी’वरून राऊतांचा सरन्यायाधीशांवर निशाणा; “तेच ब्रँड अ‍ॅम्बेसेडर”

‘कॉक्रोच जनता पार्टी’वरून राऊतांचा सरन्यायाधीशांवर निशाणा; “तेच ब्रँड अ‍ॅम्बेसेडर”

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षासह न्यायव्यवस्थेवरही जोरदार टीका केली. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा उल्लेख करत त्यांनी थेट भारताच्या सरन्यायाधीशांवर निशाणा साधला. “या पार्टीचे फॉलोअर्स वाढण्यास भारताचे सरन्यायाधीशच कारणीभूत असून तेच या पक्षाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत,” असा आरोप राऊत यांनी केला.

राऊत म्हणाले, “’कॉक्रोच जनता पार्टी’ ही देशातील न्यायव्यवस्थेचीच देण आहे. जर या पक्षाचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले असेल, तर त्यांना न्याय देण्याची जबाबदारीही सरन्यायाधीशांचीच आहे. ही तुमचीच पार्टी असून तुमच्या प्रेरणेतून ती निर्माण झाली आहे.”

देशातील बेरोजगारी आणि तरुणांमधील अस्वस्थतेचा संदर्भ देत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “या पार्टीला लाखो लोक पाठिंबा देत असतील, तर त्यामागे देशातील बेरोजगार आणि नाराज तरुणांची भावना आहे. भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षाभंग झाल्यामुळे लोक अशा व्यासपीठांकडे वळत आहेत. हे देशासाठी दुर्दैवी चित्र आहे,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपरोधिक टीका करताना राऊत म्हणाले, “पंतप्रधानांनी इटली दौऱ्यावरूनच या विषयावर प्रतिक्रिया द्यावी. भारतात परतल्यानंतर त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या प्रमुखांना भेटून ‘मेलडी’ चॉकलेट द्यावे.”

शिवसेना पक्षाच्या चिन्हाच्या वादावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनुसार चार न्यायाधीश बदलले तरी शिवसेनेच्या चिन्हाबाबत न्याय मिळत नसेल, तर संविधानप्रेमी जनता नाराज होणारच. आम्ही काही कॉक्रोच नाही; आम्ही वाघाचे बच्चे आहोत. आमचा वाघांचा पक्ष आहे आणि आम्ही डरकाळ्या फोडणारच,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आधीच तापलेल्या राज्यातील राजकीय वातावरणात राऊत यांच्या या वक्तव्यामुळे न्यायव्यवस्था आणि राजकीय पक्षांमध्ये नव्या वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon