प्रत्येक शाळेत ‘बाल सुरक्षा समिती’; २२७ प्रभागांत ‘वॉर्ड बाल संरक्षण समिती’ स्थापन होणार
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शाळेत ‘बाल सुरक्षा समिती’ तसेच मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये ‘वॉर्ड बाल संरक्षण समिती’ स्थापन करण्याबाबत लवकरच धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी दिली.
शाळांमधील लैंगिक अत्याचार, छेडछाड आणि बालसुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची मंगळवारी भेट घेतली. त्यावेळी महापौरांनी शिक्षण विभागाला बालसुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांचा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत सर्व शाळांमध्ये ‘चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी’ सक्तीची करणे, शिक्षक व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी, सीसीटीव्ही यंत्रणा, ‘गुड टच-बॅड टच’ जनजागृती, स्वसंरक्षण प्रशिक्षण, महिला सुरक्षा अधिकारी नियुक्ती, तक्रारपेटी व हेल्पलाइन यंत्रणा आदी उपाययोजनांवर चर्चा झाली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा, पालक, पोलीस आणि प्रशासन यांच्यात समन्वय वाढवून विशेष अभियान राबविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.