वांद्रे रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत इमारतींवर हातोडा; ब्रिज बंदमुळे प्रवाशांचे हाल

वांद्रे रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत इमारतींवर हातोडा; ब्रिज बंदमुळे प्रवाशांचे हाल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाच्या पूर्वेकडील रेल्वे रुळांलगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई सुरू करण्यात आली. तीन ते पाच मजली घरांवर जेसीबीचा हातोडा चालत असून, या कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या कारवाईचा फटका रेल्वे प्रवाशांनाही बसत आहे. वांद्रे स्थानकावरील पूर्वेकडे जाणारा मधला फूटओव्हर ब्रिज सुरक्षेच्या कारणास्तव २३ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. योग्य पूर्वसूचना, सूचना फलक किंवा मार्गदर्शन नसल्याने प्रवाशांना एक ब्रिज चढून पुन्हा खाली उतरून दुसऱ्या ब्रिजचा वापर करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खार ते माहीमदरम्यान रेल्वे रुळांलगत उभारलेल्या सुमारे ४०० ते ५०० झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे १०० झोपड्या अधिकृत मानण्यात आल्या असून त्यांना वगळण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २९ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल, बॅरिकेडिंग यंत्रणा आणि आपत्कालीन पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. गरीब नगर परिसरात सुमारे ४०० कर्मचारी या मोहिमेसाठी कार्यरत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र, प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. स्थानकांवरील घोषणांमध्ये स्पष्टता नसल्याने अनेक प्रवाशांना ब्रिज बंद असल्याची माहिती उशिरा मिळते. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ब्रिज बंद करण्यात आला आहे, त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी अधिकारी किंवा सुरक्षा कर्मचारीही तैनात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

तोडक कारवाईदरम्यान परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेकडून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon