शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये आढळली प्रश्नपत्रिका; दिल्ली न्यायालयानं ठोठावली ९ दिवसांची सीबीआय कोठडी
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली – नवी दिल्ली: दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयानं ‘NEET’ पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आणखी एका आरोपीला नऊ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. शिवराज मोटेगावकर असे या आरोपीचं नाव आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी आरोपीला नऊ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.
शिवराज रघुनाथ मोटेगावकर याला सीबीआय कोठडीत पाठवण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले. सीबीआयच्या माहितीनुसार मोटेगावकर याला १७ मे रोजी महाराष्ट्रातील लातूर येथून अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान, नीटची फुटलेली प्रश्नपत्रिका मोटेगावकर याच्या मोबाईल फोनमध्ये आढळून आल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.
सीबीआयच्या दाव्यानुसार NEET पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या संघटित टोळीचा मोटेगावकर हा एक सक्रिय सदस्य होता. फुटलेली NEET प्रश्नपत्रिका शेअर करण्यात आणि कोचिंग सेंटर्सच्या माध्यमातून उत्तर पत्रिका मिळवून देण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानं स्वत: अनेक विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका पुरवली होती.
मनीषा मांढरे १४ दिवसांच्या सीबीआय कोठडीत- यापूर्वी, १७ मे रोजी न्यायालयानं या प्रकरणातील नववी आरोपी असलेल्या मनीषा मांढरेला १४ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. NTA च्या वतीने प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची मनीषा मंधारे ही एक सदस्य होती. मनीषाला मथुरेतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. NEET प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी रसायनशास्त्राचे शिक्षक पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप मनीषा मांढरे हिच्यावर आहे. न्यायालयानं पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांना १६ मे रोजी १० दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं होतं.
१५ मे रोजी न्यायालयानं धनंजय लोखंडेला सहा दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं होतं. मनीषा वाघमारेनं NEET प्रश्नपत्रिका धनंजय लोखंडे याच्याकडे सोपवली होती, असा आरोप आहे. त्यानंतर, धनंजय लोखंडे याने प्रश्नपत्रिका शुभम खैरनार याच्याकडे दिली. १४ मे रोजी न्यायालयानं पाच आरोपींना सात दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं होतं. १४ मे रोजी न्यायालयानं पाच आरोपींना सीबीआय कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये नाशिकचा शुभम खैरनार, जयपूरचा मंगिलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल तसेच गुरुग्रामचा यश यादव यांचा समावेश आहे. शुभम खैरनारला १३ मे रोजी मुंबईत अटक करण्यात आली. त्याला दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला आणण्यात आलं.