पश्चिम बंगाल बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन आरोपी मुंबईत जेरबंद

पश्चिम बंगाल बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन आरोपी मुंबईत जेरबंद

गीतांजली एक्सप्रेसमधून प्रवास करताना बोरीवलीत सापळा; मुंबई गुन्हे शाखा युनिट-५ ची कारवाई

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेरहामपूर परिसरात झालेल्या बॉम्बफेक प्रकरणातील दोन फरार आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-५ पथकाने अटक केली. दोघांना बोरीवली रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

बेरहामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच स्फोटक पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर संबंधित आरोपी फरार झाले होते. तपासादरम्यान आरोपी कोलकाता-मुंबई गीतांजली एक्सप्रेसने मुंबईत येत असल्याची गोपनीय माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट आणि युनिट-५च्या संयुक्त पथकाने दादर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान सापळा रचला. संशयित हालचालींवर लक्ष ठेवून दोन्ही आरोपींना बोरीवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत दोघांचाही बॉम्बफेक प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रॉकी खान (२३) आणि शाहदत सरकार (३५) यांचा समावेश आहे. दोघेही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेरहामपूर येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, बेरहामपूर पोलिसांचे विशेष पथक मुंबईत दाखल झाल्यानंतर आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर दोघांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केली.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या नेतृत्वाखाली क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट व युनिट-५च्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon