वसईतील एटीएमचा ‘जॅकपॉट’; १०० मागितले तर ५००, तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची गर्दी

वसईतील एटीएमचा ‘जॅकपॉट’; १०० मागितले तर ५००, तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची गर्दी

योगेश पांडे / वार्ताहर

वसई : एटीएममधून पैसे काढताना अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम मिळाली तर? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र वसईतील गोलानी नाका परिसरात शनिवारी रात्री प्रत्यक्षात असाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. हिताची कंपनीच्या एटीएममध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांनी मागितलेल्या रकमेपेक्षा अनेक पटीने अधिक पैसे मशीनमधून बाहेर येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने एटीएममधून १०० रुपये काढण्याची विनंती केली असता मशीनमधून तब्बल ५०० रुपये बाहेर आले. विशेष म्हणजे संबंधित ग्राहकाच्या खात्यातून केवळ १०० रुपयेच डेबिट झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे ४०० रुपये काढण्याचा व्यवहार केल्यानंतर एटीएममधून २००० रुपये मिळाल्याचाही प्रकार घडला. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आलेले ग्राहक सुरुवातीला चक्रावून गेले.

हा प्रकार काही वेळातच परिसरात वाऱ्यासारखा पसरला. एटीएममधून अधिक रक्कम मिळत असल्याची माहिती समजताच नागरिकांनी एटीएमबाहेर मोठी गर्दी केली. काहींनी अतिरिक्त रक्कम मिळवण्यासाठी व्यवहार केल्याचेही समोर आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. संभाव्य आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी संबंधित एटीएममधील व्यवहार तत्काळ बंद करण्यात आले. तसेच परिसरात जमलेल्या नागरिकांना हटवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

दरम्यान, या घटनेची माहिती संबंधित बँक प्रशासन आणि तांत्रिक विभागाला देण्यात आली असून, मशीनची तपासणी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नोटांच्या कॅसेटमध्ये चुकीची सेटिंग किंवा सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तांत्रिक तपास पूर्ण झाल्यानंतरच एटीएम सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

वेळीच पोलिसांनी आणि बँक प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे मोठा आर्थिक फटका टळल्याचे मानले जात आहे. मात्र काही तास सुरू असलेल्या या गोंधळामुळे वसई शहरात या एटीएमची जोरदार चर्चा रंगली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon