झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या सहीमुळे नवा वाद निर्माण; सिद्दीकींची आमदारकी धोक्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावाची काही दिवसांपूर्वी घोषणा केली. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर होताच आता त्यांच्या आमदारकीवर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या एबी फॉर्मवरील सहीमुळे हा नवा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादामागे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले एक पत्र आणि एबी फॉर्मवरील माहिती जुळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला आहे. गेल्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीच्या या पत्रात पक्षाकडून करण्यात येत असलेला हा पत्रव्यवहार अंतिम समजण्यात यावा, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या पत्राच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच ३० एप्रिल रोजी झिशान सिद्दीकी यांनी एक AB फॉर्म जोडला. त्यावर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वाक्षरी आहे.
निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार जर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष पदावर अधिकृत नसतील, तर त्यांनी ‘एबी फॉर्म’वर केलेली स्वाक्षरी तांत्रिकदृष्ट्या अवैध ठरू शकते. अशा परिस्थितीत झिशान सिद्दीकी यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार मानण्यात कायदेशीर अडचणी येतील. त्यामुळे पर्यायाने त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता कायदेतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निवडून येत ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार ठरले होते. त्यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही सांभाळले होते.