राष्ट्रवादी काँग्रेसला ठाणे-पालघरमध्ये धक्का; माजी खासदार आनंद परांजपे यांचा पक्षाला रामराम
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ठाणे-पालघर परिसरात मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाचे माजी खासदार तथा मुख्य प्रवक्ता आणि सरचिटणीस आनंद परांजपे यांनी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठविला आहे.
परांजपे यांनी आपल्या राजीनामा पत्रात, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक – ठाणे व पालघर (जिल्हा) व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,” असे नमूद केले आहे. पक्षाने आजपर्यंत विविध जबाबदाऱ्या देऊन दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली आहे.
“पक्ष संघटनेमध्ये अनेक जबाबदाऱ्या दिल्याबद्दल मी पक्षाचा शतशः आभारी आहे. तरी माझा राजीनामा आपण स्वीकारावा,” अशी विनंतीही त्यांनी पत्रातून केली आहे.
दरम्यान, त्यांच्या या अचानक निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे-पालघरमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परांजपे यांच्या राजीनाम्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पत्राची प्रत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही पाठविण्यात आली आहे.