प्रवेशासाठी ‘डोनेशन’ची मागणी; भिवंडीत उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह तिघांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी : शहरातील एका अनुदानित उर्दू माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाखाली अतिरिक्त फी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुख्याध्यापिकेसह खासगी लिपिक आणि खासगी शिक्षिकेला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आठवी इयत्तेत प्रवेश देण्यासाठी एका पालकाकडे पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. संबंधित पालकाने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला.
त्याअनुषंगाने आरोपींना चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत मुख्याध्यापिका, खासगी शिक्षिका आणि लिपिक या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, अनुदानित शाळांमधील प्रवेश प्रक्रियेत आर्थिक गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत असून, या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.