मध्य रेल्वेचा पुन्हा गोंधळात गोंधळ, कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर; तीन लोकल रद्द
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने लागू केलेल्या नवीन नियमांविरोधात लोको गार्डनी अचानक पुकारलेल्या ‘वर्क टू रूल’ आंदोलनामुळे बुधवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. या आंदोलनामुळे मध्य आणि हार्बर अशा दोन्ही मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला असून तीन लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या.
रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांना विरोध दर्शवण्यासाठी लोको गार्डनी आंदोलनाचे हत्यार उपसले. विशेष म्हणजे, हे आंदोलन ‘वर्क टू रूल’ (नियमानुसार काम) पद्धतीने करण्यात आले, ज्यामुळे कामाचा वेग मंदावला आणि गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.
संध्याकाळी ०५:१५ वाजता हे आंदोलन सुरू झाले आणि ०५:४५ वाजता मागे घेण्यात आले. अवघ्या अर्ध्या तासाच्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या रांगा लागल्या. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गोंधळामुळे ३ लोकल गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर अनेक गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
संध्याकाळची वेळ ही नोकरदारांसाठी कार्यालयातून घरी परतण्याची असते. ऐन गर्दीच्या वेळीच गाड्यांचा खोळंबा झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सह दादर, कुर्ला आणि ठाणे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. गाड्या कधी सुटणार याची स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.
अर्ध्या तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी रात्री उशिरापर्यंत रेल्वेचे वेळापत्रक पूर्वपदावर आले नव्हते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.