बीडमध्ये शुल्लक कारणावरून कीर्तनकार कैलास राजेंद्र आनंदे महाराज यांना अमानुष मारहाण; गावगुंडांवर कारवाईची मागणी
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – राज्यात गेल्या वर्षभरापासून बीड जिल्हा विविध गुन्हेगारी घटनांनी लक्षवेधी ठरला असून अद्यापही बीडमधील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीत. बीडच्या ठाकर आडगाव गावात पाच ते सात गावगुंडांनी एका कीर्तनकारला अमानुष मारहाण केली आहे. लोखंडी राॅड, केबल वायर, लाकडी दांड्याने मारहाण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बीडमध्ये शुल्लक कारणावरून कीर्तनकार कैलास राजेंद्र आनंदे महाराज यांना लोखंडी राॅड, केबल वायर, कोयता, चाकु, शाॅकअप, लाकडी दांडयांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी काळी १० ते १०:१५ च्या दरम्यान ही घडली आहे. गेवराई शहरात जातेगाव रोडवर गाव गुंडांकडून कैलास आनंदे या कीर्तनकार महाराज यांना एकटे गाठून मारहाण केली. गंभीर जखमी महाराजांवर बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
कैलास आनंदे महाराज हे स्वानंद सेवा हे गुरूकूल चालवतात. कैलास आनंदे महाराज यांनी जोग महाराज वारकरी संस्था आळंदी येथून वारकरी सांप्रदयाचे शिक्षण घेऊन ग्रामीण भगात वारकरी शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. नेमकी मारहाण कुठल्या कारणास्तव केले याचे कारण समोर आले नाही. मात्र हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे . कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार महाराजांना अशा पद्धतीने अमानुष मारहाण करणारे गावगुंड कोण त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे सत्र संपता संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. बीडमध्ये चोरी, घरफोडी, मारामारी, बलात्कार, छेडछाड, लुटमारीसारख्या घटना सुरूच आहेत. यामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता बीडला बिहार असे संबोधले जात आहेत. काल झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बीडमधील गुन्हेगारी थांबणार कधी? हा सवाल कायम आहे.