खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात, पोलीस तपास सुरू

खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात, पोलीस तपास सुरू

योगेश पांडे / वार्ताहर 

मीरा भाईंदर – जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथे एका ५८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यून खळबळ उडाली असून हा अपघाती मृत्यू आहे की घातपात याची चर्चा परिसरात होत आहे. भाईंदर पूर्व येथील नवघर रोड परिसरातील कर्नाटका बँकेसमोरील क्लासिक स्टील इंडस्ट्रीमध्ये रविवारी सकाळी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे मुंडक खिडकीच्या आत तर शरीर बाहेर असल्याचे आढळून आल्याने ही घटना हत्या आहे की अपघात, याबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच मीरा रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचा मोबाईल खिडकीबाहेर पडला होता. तो काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याची मान खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकल्याने गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा अपघाती मृत्यू आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी धाव घेतली असून घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. याबाबत, पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि स्थानिकांची विचारपूस केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon