डेटिंग ॲपच्या आमिषातून तरुणाला लुटले; वारजे पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

डेटिंग ॲपच्या आमिषातून तरुणाला लुटले; वारजे पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

अवघ्या ३० मिनिटांत मुख्य आरोपी जेरबंद; अल्पवयीन साथीदार ताब्यात

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे : डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून मारहाण व लूटमार करणाऱ्या टोळीचा वारजे माळवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून, सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून वाढणाऱ्या गुन्हेगारीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाची एका डेटिंग ॲपवरून अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली होती. चॅटिंगनंतर संबंधित व्यक्तीने त्याला भेटण्यासाठी बोलावले. मात्र, ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच चार जणांनी संगनमताने त्याला घेरून बेदम मारहाण केली. त्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून जबरदस्तीने डिजिटल मनी ट्रान्सफर करून घेतले तसेच गळ्यातील चांदीची चैन हिसकावून आरोपी पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तांत्रिक विश्लेषण सुरू केले. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अवघ्या ३० मिनिटांत मुख्य आरोपी ओम गणेश वाघमारे (वय २०) याला अतुलनगर चौक परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे.

या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सवर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon