‘ड्राय डे’ला मद्यविक्री प्रकरण तापले; ‘विकास पॅलेस’व ‘साधना बार’चाही परवाना निलंबित

‘ड्राय डे’ला मद्यविक्री प्रकरण तापले; ‘विकास पॅलेस’व ‘साधना बार’चाही परवाना निलंबित

कायमस्वरूपी परवाना निलंबित करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी यांची घेणार भेट

दोन्ही बारवर दैनिक पोलीस महानगरची करडी नजर

कल्याण : कल्याण परिसरात ‘ड्राय डे’च्या दिवशी बेकायदेशीर मद्यविक्री केल्याप्रकरणी प्रशासनाने कठोर भूमिका घेत विकास पॅलेस बार अँड रेस्टॉरंट याचा परवाना निलंबित केल्यानंतर साधना बार अँड रेस्टॉरंट याचाही परवाना निलंबित करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यभर ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला होता. मात्र, ‘दैनिक पोलीस महानगर’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कल्याणमधील काही बारमध्ये सीलबंद मद्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणानंतर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अंतर्गत कारवाई करत दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित केले. ‘ड्राय डे’च्या दिवशी मद्यविक्री करणे हा दंडनीय गुन्हा असून, परवान्याच्या अटींचे उल्लंघन झाल्यास परवाना निलंबित किंवा कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे.

दरम्यान, स्टिंग ऑपरेशनमध्ये काही ढाबे आणि स्टॉलवरूनही बेकायदेशीर मद्यपुरवठा होत असल्याचे समोर आल्याने कारवाईचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महसूल गळती आणि आर्थिक अनियमिततेचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या कारवाईनंतरही संबंधितांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणांवर जबाबदारी निश्चित होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक उत्तमराव शिंदे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

दरम्यान, विकास पॅलेस व साधना बार अँड रेस्टॉरंट यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी सोमवारी एक शिष्टमंडळ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत संबंधित बारविरोधात कठोर आणि अंतिम कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे दैनिक पोलीस महानगरने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon