विरार रेल्वे स्थानकाजवळ असणारा ‘नारिंगी फाटक’ शुक्रवार पासून बंद; विरारकरांची अखेर वाहतूक कोंडीतून सुटका, नवीन पूल सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – विरारमधील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. विरारमधील नागरिकांचा प्रवास आणखीनच जलद होणार आहे. विरार रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या ‘नारिंगी फाटक’ म्हणजेच, लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक ४१ हा शुक्रवार दिनांक ०८ मे पासून बंद करण्यात आला आहे. ह्या लेव्हल क्रॉसिंग गेट नं. ४१ च्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या नव्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारपासूनच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाण पुलामुळे पुर्वेहून पश्चिमेला जाण्यासाठी होणारी वाहतुकी कोंडी आता कमी होणार आहे. त्यामुळे एका अर्थी विरारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विरार पुर्व- पश्चिम जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर या एलसी- ४१ रेल्वे फाटकाचा वापर करतात. विरारमधील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेला हा मार्ग आहे. या मार्गावरून बऱ्याचदा पाण्याच्या टँकरची ये- जा होत असते. मात्र, रेल्वे रूळ ओलांडणारा मार्ग तिरपा आणि उंच सखल असल्यामुळे अनेकदा टँकर रूळांमध्ये अडकत होते. दर आठवड्याला एक तरी टँकर फाटकामध्ये अडकून रेल्वे वाहतूक तब्बल २० ते ३० मिनिटांसाठी ठप्प होत होती. यामुळे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसच्या आणि उपनगरीय लोकलच्या वाहतुकीवर मोठा परिणाम व्हायचा. सतत घडणाऱ्या घटनेमुळे विरार शहरातील नागरिक त्रासले होते.
एलसी- ४१ रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे वैतरणा- डहाणू रोड विभागातील रेल्वे वाहतूक सुरळीत होईल. फाटक सुरू केल्यानंतर डहाणू लोकलला १० ते १२ मिनिटे थांबावे लागायचे. त्यामुळे लोकल दररोज उशिरा धावायच्या. नवीन पादचारी पूल झाल्यामुळे विरार पूर्व- पश्चिममधील नागरिकांचा प्रवास अधिकच सुसाट होणार आहे. सध्याचा एकमेव पूल वाहतूक सांभाळण्यासाठी लहान पडत होता. त्यामुळे आता नवीन चार पदरी पूल झाल्यामुळे विरार पूर्व- पश्चिममधील नागरिकांचा प्रवास अधिकच वेगवान होईल, यात शंका नाही. विरारमध्ये हा नवीन उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, यामध्ये शंका नाही. शिवाय, रेल्वेचा आणि वाहनांचा होणारा खोळंबा कमी होऊन प्रवाशांच्या प्रवासाचाही वेळ कमी होईल.