सावधान कल्याणकर! ‘प्राण्यांचे मास्क’ लावून फिरणारी घरफोडी टोळी सक्रिय; बंद घर फोडून साडे पाच तोळे सोने लंपास
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण शहरात सध्या एका अजब पण तितक्याच सराईत घरफोडी टोळीने धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. तोंडाला प्राण्यांचे मुखवटे लावून चारचाकी वाहनातून फिरणारी ही टोळी आता कल्याण पूर्वेतील एका बंद घरात चोरी करून पसार झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील एका रहिवासी परिसरातील कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून सुमारे साडे पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले.
विशेष म्हणजे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी प्राण्यांचे मास्क घालून फिरताना दिसत आहेत. आरोपी चारचाकी वाहनातून परिसराची पाहणी करत असल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही टोळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या टोळीचा यापूर्वी झालेल्या घरफोड्यांशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, नागरिकांनी घर बंद ठेवताना शेजाऱ्यांना माहिती देणे, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.