सफाळे बाजारपेठेत हिट अँड रन; २४ तासांत दोषारोपपत्र दाखल

सफाळे बाजारपेठेत हिट अँड रन; २४ तासांत दोषारोपपत्र दाखल

मद्यधुंद चालकाने दोन कार, दोन दुचाकींना दिली धडक; पोलिसांची तातडीची कारवाई

पालघर / नवीन पाटील

पालघर तालुक्यातील सफाळे येथील गजबजलेल्या बाजारपेठेत बुधवारी सायंकाळी झालेल्या हिट अँड रन प्रकरणात सफाळे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत तातडीची कारवाई केली आहे. भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालवत दोन कार व दोन दुचाकींना धडक देणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ६ मे रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी रंजीतकुमार रामचंद्र महतो (वय ३०, मूळ रा. बाथो, ता. बेहरा, जि. दरभंगा, बिहार) याने त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचे सिमेंट लोड वाहन (क्र. MH-12-WJ-3161) मद्यप्राशन करून भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविले. यावेळी त्याने फिर्यादी मंगेश रघुनाथ कदम यांच्या वाहनासह टाटा सफारी (क्र. MH-48-CC-3666), बुलेट मोटारसायकल (क्र. MH-48-AF-8949) आणि मारुती सुझुकी स्विफ्ट (क्र. MH-02-BY-8818) या वाहनांना जोरदार धडक दिली.

या अपघातात संबंधित वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाजारपेठ परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होती. काही मुले व भाजी विक्रेते रस्त्यालगत उपस्थित होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच सफाळे पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध सफाळे पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २८१ तसेच मोटार वाहन अधिनियम कलम १८४ आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा जलदगतीने तपास पूर्ण करून अवघ्या २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध पालघर पोलीस दलाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon