आधारवाडी कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू; उपचारास विलंबाचा आरोप, चौकशीची मागणी

आधारवाडी कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू; उपचारास विलंबाचा आरोप, चौकशीची मागणी

चार तास उशिराने रुग्णालयात हलवले; नातेवाईकांचा संताप, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण : कल्याणमधील आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश पवार असे मृत कैद्याचे नाव असून उपचारासाठी विलंब झाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवार याला मंगळवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास छातीत दुखू लागले. मात्र, त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले नाही. तब्बल चार तासांनी, रात्री नऊच्या सुमारास त्याला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, पवार याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला नसून कारागृह अधीक्षकांच्या खासगी वाहनातून नेण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती तत्परता दाखवली गेली का, असा सवाल उपस्थित होत आहे.

घटनेची माहिती मिळताच संतप्त नातेवाईकांनी उल्हासनगर येथील रुग्णालयात गर्दी करत निषेध व्यक्त केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत असून कारागृह प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. चौकशीनंतरच हलगर्जीपणा झाला की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon