रे रोड परिसरात ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; चौघे जेरबंद, मुख्य सूत्रधार फरार
स्टिंग ऑपरेशननंतर पोलिसांची धडक कारवाई; गांजा व बंदी घातलेले कफ सिरप जप्त
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : रे रोड (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळील पोर्ट ट्रस्ट रोड (दारुखाना जंक्शन) परिसरात सुरू असलेल्या ड्रग्स विक्रीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी यासिन उर्फ ‘बांगाली’ आणि ओवैस खान हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
महानगर डेलीच्या पथकाने गुप्त स्टिंग ऑपरेशनद्वारे या अवैध कारभाराचा भांडाफोड केला. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोर्ट झोनचे उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवरी पोलिसांनी तातडीने छापा टाकला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोहित खोथ, निरीक्षक अभिजीत जाधव आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत चौघांना अटक केली. यामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख इमरान (२३), मोहम्मद अल्ताफ अब्दुल रहीम शेख (२५) आणि अब्दुल आरिफ शेख उर्फ हैदर (२८) यांचा समावेश आहे. अल्पवयीन आरोपीला डोंगरी येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले असून उर्वरित तिघांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी सेवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींंसह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून गांजा आणि बंदी घातलेले कफ सिरप जप्त करण्यात आले.
दरम्यान, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असलेले यासिन उर्फ ‘बांगाली’ आणि ओवैस खान हे फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी सेवरी पोलीस, गुन्हे शाखा आणि इतर पथके संयुक्त कारवाई करत आहेत.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, यासिन याच्यावर यापूर्वीही अमली पदार्थ विक्रीचे गुन्हे नोंद असून माटुंगा परिसरात त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच एंटॉप हिल आणि टिटवाला परिसरात त्याने नेटवर्क उभे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा लवकरच माग काढण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.