विले पार्ले पूर्वेत महिलेवर क्रिकेट बॅटने हल्ला; ‘खूनाच्या प्रयत्ना’चा आरोप, २४ तास उलटूनही FIR नसल्याने संताप
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई – विले पार्ले (पूर्व) येथील श्रद्धानंद रोड परिसरात ४५ वर्षीय महिलेवर क्रिकेट बॅटने निर्घृण हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणाकडे खून करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात असताना, घटना घडून २४ तास उलटूनही FIR नोंद न झाल्याचा आरोप पीडिता आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पीडित महिला विले पार्ले (पूर्व) येथील रहिवासी असून, समोर असलेल्या ‘अरिहंत मेटल अँड पेपर मार्ट’ या दुकानाचा मालक चेतन जैन हा गेल्या काही महिन्यांपासून सतत छेडछाड व त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “मी जिथे जाईन तिथे तो माझा पाठलाग करत असे. याबाबत मी विले पार्ले पोलिस ठाण्यात तीन वेळा तक्रार दिली असून त्याच्या प्रती माझ्याकडे आहेत,” असे पीडितेने सांगितले.
माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सायंकाळी पीडिता बाजारात जात असताना आरोपीने पुन्हा छेडछाड केली. त्याला जाब विचारताच तो संतापला आणि दुकानातून क्रिकेट बॅट आणून महिलेवर हल्ला केला. आरोपीने महिलेच्या डोक्यावर, हातावर आणि शरीरावर अनेकवार प्रहार केल्याचा आरोप आहे.
हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला सुमारे २५ टाके घालण्यात आले आहेत, तर हाताला फ्रॅक्चर झाले आहे. प्राथमिक उपचारानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून MRI आणि CT स्कॅन करण्यात आले आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच विले पार्ले पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी रुग्णालयात पोहोचून पीडितेचा जबाब नोंदवला. मात्र, इतक्या गंभीर घटनेनंतरही २४ तास उलटून FIR नोंदवण्यात आलेली नसल्याचा आरोप होत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या घटनेमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.