सव्वादहा कोटींची फसवणूक; दोन बंधूंविरुद्ध एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : चांदी व रोख रकमेचा अपहार करून सुमारे सव्वादहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविश योगेश जैन आणि आलिश योगेश जैन अशी आरोपींची नावे असून, त्यांनी विश्वास संपादन करूनच व्यापाऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तक्रारदार गिरगाव परिसरात राहणारे चांदीचे व्यापारी असून झवेरी बाजारात त्यांच्या मालकीची खासगी फर्म आहे. या फर्ममार्फत ते घाऊक स्वरूपात चांदी व दागिन्यांचा व्यवसाय करतात. अविश जैन हा सुरुवातीला त्यांच्या फर्ममध्ये नोकरीस होता. त्याच्याकडे अकाउंट्स आणि विक्रीची जबाबदारी होती. काही वर्षांनी त्याने सुमारे ७० लाखांची गुंतवणूक करून ३० टक्के भागीदारी घेतली.
यानंतर अविश व त्याचा भाऊ आलिश यांनी संगनमताने कंपनीत गैरव्यवहार सुरू केल्याचा आरोप आहे. कंपनीच्या सॉफ्टवेअरमधील नोंदी पुसून व्यवसायात मोठे नुकसान होत असल्याचे भासविण्यात आले. तसेच कंपनीला एक कोटींचा तोटा झाल्याचे दाखवत तक्रारदारांवर सहा कोटी रुपये देणे असल्याचा बनाव करण्यात आला.
मात्र व्यवहार संशयास्पद वाटल्याने तक्रारदारांनी बँक स्टेटमेंट व इतर आर्थिक नोंदींची तपासणी केली असता मोठा घोटाळा उघडकीस आला. त्यात १ कोटी १७ लाख ५० हजार रुपये किमतीचे ४७ किलो चांदीचे ठोकळे, ४ कोटी ७५ लाख रुपये किमतीचे १४६ किलो चांदीचे दागिने, तसेच सुमारे ४ कोटी ३० लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण सव्वादहा कोटींचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी तक्रारदारांनी दिलेल्या फिर्यादीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांविरुद्ध अपहार व फसवणुकीचे गुन्हे नोंद केले असून पुढील तपास सुरू आहे.