१३ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप, आरोपीने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन केली आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
बारामती – पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एका ५५ वर्षीय आरोपीने कोठडीत असतानाच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. रवींद्र व्यंकटराव गार्डी असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव असून, या घटनेमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपी रवींद्र गार्डी याला एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली वडगाव निंबाळकर पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. या गंभीर गुन्ह्याखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कोठडीत असताना सोमवारी रात्री उशिरा रवींद्र गार्डी याने आपल्या पँटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोठडीत असलेल्या आरोपीने गळफास घेतल्याने बारामती पोलिसांवर टीका होत आहे.
कायद्यानुसार, पोलीस कोठडीत असताना जर एखाद्या आरोपीचा मृत्यू झाला किंवा त्याने आत्महत्या केली, तर त्याची न्यायालयीन चौकशी केली जाते. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याला भेट दिली आहे.