भूसंपादनातील अनियमिततेप्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी निलंबित
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुंबई पश्चिम उपनगरातील बोरीवली येथील भूसंपादन प्रकरणात गंभीर अनियमितता केल्याच्या आरोपांवरून तत्कालीन उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी यांना राज्य शासनाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
सदर प्रकरणात भूसंपादन करताना जमिनीच्या दराऐवजी सदनिकांच्या विक्री व्यवहारांच्या आधारे मोबदला निश्चित करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच भारग्रस्त जमिनीसाठी आवश्यक वजावट न करता, मूळ जमीनमालकांना डावलून सुमारे ६०.३० कोटी रुपयांचा मोबदला थेट विकासकाला वितरित करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
या प्रक्रियेत शासन नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष चौकशीत आढळून आले आहेत. त्यामुळे शासनाने कठोर भूमिका घेत बिरारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी, ठाणे कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे. तसेच पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय न करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
या कारवाईमुळे भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, संबंधित प्रकरणातील पुढील चौकशीकडे प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.