बुधवार पेठेतील कुंटणखान्यावर फरासखाना पोलिसांची धाड; चार फ्लॅट सीलबंद, तीन बांगलादेशी महिला ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर फरासखाना पोलिसांनी धाड टाकत चार फ्लॅट सीलबंद केले. या कारवाईदरम्यान अनाधिकृतपणे भारतात वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले. ही माहिती पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली.
पोलिसांना बुधवार पेठ परिसरात काही फ्लॅटमध्ये अनैतिक मानवी वाहतुकीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार फरासखाना पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत चार फ्लॅट सीलबंद करण्यात आले.
तपासादरम्यान संबंधित ठिकाणी वास्तव्यास असलेल्या तीन महिला या बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनधिकृतपणे भारतात राहत असल्याचेही उघड झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.
या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम, १९५६ तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.