शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष; १०० ते १५० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सागर कारिवडेकर ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
सावंतवाडी : शेअर मार्केटमधून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून शंभर ते दीडशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला सागर सुबोध कारिवडेकर याला सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथून पोलिसांनी रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. तो आपल्या सासुरवाडीला आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचून नाट्यमय कारवाई केली.
कारिवडेकर याच्याविरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात पुण्यातील गुंतवणूकदारांच्या अंगावर वाहन घालून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच ठाणे येथेही फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी सावंतवाडीतील सर्वोदयनगर येथे शेअर्समधील परताव्याची रक्कम मागण्यासाठी आलेल्या पुण्यातील पाच गुंतवणूकदारांवर वाहन घालून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शौनक सपकाळ (रा. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सागर कारिवडेकर याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात तहा राजगुरू, तला राजगुरू (रा. बांदा) तसेच नितीन मेस्त्री (रा. कोलगाव) यांना अटक करण्यात आली होती; मात्र सागर कारिवडेकर तेव्हापासून फरार होता. सावंतवाडी पोलिस त्याचा शोध घेत होते.
दरम्यान, सावंतवाडीतील घटनेनंतर शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या नावाखाली आणखी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. संबंधित रकमेचा परतावा वेळेत न मिळाल्याने अनेक ठेवीदारांनी मुंबई व ठाणे येथील पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल केल्या. या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
ठाणे पोलिसांनी कारिवडेकर याचा सावंतवाडीतील बंगला, वाहने तसेच सावंतवाडी व वेंगुर्ले येथील मालमत्ता जप्त केली असून त्याची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास वेगाने सुरू असल्याने त्याचा शोध तीव्र करण्यात आला होता.
रविवारी तो कारिवडे येथील सासुरवाडीला येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार महेश जाधव, महेश निरवडेकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
सध्या पुण्यातील तक्रारदार सपकाळ, देवकाते आदी गुंतवणूकदारांवर हल्ला प्रकरणी त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.