सोन्याची चैन पाहण्याच्या बहाण्याने रिक्षा चालकाची फसवणूक

सोन्याची चैन पाहण्याच्या बहाण्याने रिक्षा चालकाची फसवणूक

आरोपीला बोईसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

बोईसर / विभूती मेस्त्री 

रिक्षाचालकाची गोड बोलून फसवणूक करत सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास करणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक तपास व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

रूपेश रमेश खुर्दे (रा. कचेरी रोड, आंबेडकर नगर, पालघर) हे रिक्षाचालक असून १४ एप्रिल रोजी त्यांच्या रिक्षामध्ये एक अनोळखी इसम बसला. त्याने बोईसरला जाण्यास सांगितले. बोईसर येथे पोहोचल्यानंतर आरोपीने फिर्यादीला मधूर नाका परिसरातील वाइन शॉपमधून बिअर आणण्यास सांगितले. त्यानंतर दोघांनी रिक्षामध्ये बसून बिअर प्राशन केले.

दरम्यान, आरोपीने गोड बोलून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन पाहण्याच्या बहाण्याने हातात घेतली. काही वेळाने लघुशंकेचे कारण सांगून तो रिक्षामधून खाली उतरला आणि चैनसह पसार झाला. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले. पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोहम्मद उमर शहा (वय ४३, रा. अंबरनाथ पश्चिम, जि. ठाणे) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (बोईसर विभाग) विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत बोईसर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलीस हवालदार जयराम चौधरी तसेच पोलीस अंमलदार गणेश व्हसकोटी, मयूर पाटील, देवेंद्र पाटील, धीरज साळुंखे, मच्छिंद्र घुगे, सचिन सोनावणे, शुभम सपकाळे, किरण वाघ आणि रोहित पाटील (सर्व, बोईसर पोलीस ठाणे) यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon