टीव्ही पाहण्याच्या वादातून थरार; ठाण्यात पत्नी, मुलगी आणि नातीवर वडिलांचा चाकू हल्ला
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्याच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीने पत्नी, विवाहित मुलगी आणि चिमुरड्या नातीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील राबोडी परिसरात घडली. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना अपनानगर परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली. तक्रारदार महिला ही विवाहित असून मुलींना शाळेला सुट्टी लागल्याने १७ एप्रिलपासून ती आपल्या दोन मुलींसह माहेरी आली होती. तिचे वडील क्षुल्लक कारणांवरून वारंवार संताप व्यक्त करत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
शनिवारी रात्री कुटुंबातील सदस्य घरात एकत्र असताना रात्री १२.१५ वाजेपर्यंत टीव्ही सुरू होता. त्यानंतर काही वेळ टीव्ही बंद करण्यात आला. तक्रारदाराच्या एका मुलीचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यात आला. त्यानंतर रात्री सुमारे १२.३० वाजता तक्रारदाराच्या बहिणीने पुन्हा टीव्ही सुरू करण्यास सांगितले.
यावर आरोपी वडिलांनी ‘मला झोपायचे आहे’ असे सांगत विरोध केला आणि संतापाच्या भरात कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पत्नीने त्याला विरोध केल्यानंतर त्याने घरातील भाजी कापण्याची सुरी उचलून पत्नीच्या गळ्यावर वार केला.
पत्नीला वाचवण्यासाठी तक्रारदार महिला पुढे आली असता तिच्यावरही हल्ला करण्यात आला. तसेच तक्रारदाराची मुलगी आजीला वाचवण्यासाठी गेली असता तिच्यावरही आरोपीने चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रारीनंतर राबोडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.