नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात; ४२ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात; ४२ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

पोलीस महानगर नेटवर्क 

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. महापालिका मुख्यालयातील त्यांच्या दालनातच ही कारवाई झाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात कंत्राटदार दशरथ सुरवते हे तक्रारदार असून त्यांनी ऐरोली विभागात अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी मनुष्यबळ पुरवण्याचे काम केले होते. नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीतील कामाची बिले प्रलंबित होती. ही बिले मंजूर करण्यासाठी गायकवाड यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ४२ हजार रुपये देण्याचे ठरले होते.

सुरवते यांनी याबाबत ठाणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून गुरुवारी सकाळी महापालिका मुख्यालयात कारवाई केली. ठरल्याप्रमाणे सुरवते यांनी गायकवाड यांच्या दालनात जाऊन रक्कम दिली असता, ती स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

कारवाईनंतर गायकवाड यांच्या दालनातील कागदपत्रे आणि संगणकीय माहितीची तपासणी सुरू असून त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे लाच घेतली आहे का, याचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे महापालिकेतील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon