६ वर्षांनंतर आरोपीला जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
रवि निषाद / प्रतिनिधी
मुंबई : एप्रिल २०२० मधील एका गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात तब्बल सहा वर्षे तुरुंगात असलेल्या आरोपीला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे दीर्घ काळ न्यायप्रक्रियेत अडकलेल्या आरोपींविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
सरकार पक्षाच्या मते, आरोपी व त्याच्या साथीदारांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. कोविड काळात घडलेल्या या घटनेची त्या वेळी संपूर्ण मुंबईत मोठी चर्चा झाली होती. प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करून मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज दोन वेळा फेटाळला होता.
यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपीच्या वतीने अॅड. राज कांबळे यांनी युक्तिवाद करताना, गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले प्रथमदर्शनी ठोस पुरावे अपुरे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच साक्षी-पुराव्यांमधील त्रुटींवरही त्यांनी भर दिला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. दीर्घ काळ खटला प्रलंबित राहणे आणि ठोस पुराव्यांचा अभाव यांचा विचार करून हा निर्णय देण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, ‘मीडिया ट्रायल’मुळे अनेक आरोपींना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकरणांवर योग्य तो तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत अॅड. राज कांबळे यांनी व्यक्त केले.