मुलुंडमध्ये अत्याधुनिक ‘सेतू सुविधा केंद्र’ सुरू; नागरिकांना दाखल्यांसाठी एकाच छताखाली सेवा

मुलुंडमध्ये अत्याधुनिक ‘सेतू सुविधा केंद्र’ सुरू; नागरिकांना दाखल्यांसाठी एकाच छताखाली सेवा

रवि निषाद / प्रतिनिधी

मुंबई : नागरिकांना विविध दाखले व शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुलुंड येथील तहसीलदार कार्यालयात अत्याधुनिक ‘नागरी सेतू सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले. माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी हा उद्घाटन सोहळा पार पडला. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ काटियार यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र उभारण्यात आले आहे. नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्रे व इतर शासकीय सेवा एका ठिकाणी जलद आणि सुलभ पद्धतीने मिळाव्यात, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या वेळी लोकसेवा हक्क आयोगाचे विशेष कार्य अधिकारी दिलीप शिंदे, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, संजय गांधी योजनेचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोष्टी, तसेच इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. भाजप व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

चेंबूर मंडळ अधिकारी रंजना राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या सेतू केंद्रामुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होऊन सेवा अधिक वेगाने उपलब्ध होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon