त्र्यंबकेश्वर मंदिरात झटपट दर्शनाचा घोटाळा; महिन्याला ९० लाख कमाई, विश्वस्तच निघाला मास्टरमाईंड
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – अशोक खरात प्रकरण, टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण यामुळे नाशिकचं नाव वाईट कारणांमुळे चर्चेत आलेले आहे. असं असताना आणखी एका प्रकरणामुळे नाशिकचं नाव बदनाम होऊ लागलं आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्ताला पोलिसांनी अटक केली आहे. दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरातील दर्शनाच्या काळाबाजारातून घोटाळेबाज महिन्याला किमान ९० लाखांच्या आसपास कमाई करत असावेत असा अंदाज बांधला जात आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरू असलेल्या एका मोठ्या गैरप्रकाराचा उलगडा झाला आहे. झटपट दर्शनासाठी भाविकांकडून पैसे उकळत त्यांना लुटल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकारात मंदिराचे एक विश्वस्तच सामील असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता हे अद्याप कळू शकलेलं नाहीये.
ज्योतिर्लिंग असल्याने देशभरातून इथे भाविक येत असतात. प्रचंड गर्दी असल्याने या भक्तांना साधारणपणे ३-४ तास रांगेत उभे राहावे लागते. हे ओळखून एक गँग इथे सक्रीय झाली. काही दिवसांपूर्वी भाविकांकडून पैसे उकळत त्यांना झटपट दर्शन दिल्याप्रकरणी अभिषेक कडलग नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. अभिषेक हा मंदिराचे विश्वस्त असलेल्या पुरुषोत्तम कडलग यांचा नातेवाईक आहे.
अभिषेक हा झटपट दर्शनासाठी एका भाविकाकडून ३ हजार रुपये मागायचा. यामध्ये बार्गेनिंगही व्हायची. दिवसाला किमान १०० ते १५० लोकं २-३ हजार रुपये घेऊन आत सोडले जात होते. दर्शनासाठी गैरप्रकार सुरू असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनीच एक स्टिंग ऑपरेशन करण्यास सुरूवात केली. यामध्ये त्यांना सबळ पुरावे मिळाले असून या पुराव्यांच्या आधारे त्र्यंकेश्वर मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली आहे.
कडलग हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे म्हणत भाजपच्या आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे. पोलिसांनी दिलेली माहितीच्या आधारे आकडेमोड करून पाहिल्यास दर्शनाच्या काळाबाजारातून दिवसाला अंदाजे ३ लाख रुपयांची कमाई होत होती. या काळाबाजारात आणखीही काहीजण सामील असल्याचा संशय असून दर्शनाच्या काळा बाजारातून केलेल्या कमाईचा आकडा फेफरं आणणारा ठरू शकतो.