पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत; कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वेळेचे गणित कोलमडले

Spread the love

पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत; कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वेळेचे गणित कोलमडले

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर रविवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ उडाला. भाईंदर ते नायगाव या स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला. पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक कोलमडल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वेळेचे गणित कोलमडले. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रविवारी सकाळी ७.५२ च्या सुमारास भाईंदर आणि नायगाव स्थानकादरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. विरारकडे जाणाऱ्या मार्गावरील ओव्हेयरहेड वायरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पश्चिम रेल्वे वाहतूक कोलमडली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या तांत्रिक विभागाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या. या बिघाडामुळे सुरुवातीला दोन लोकल आणि एक मेमू गाडी मार्गावर अडकून पडल्या.

रेल्वे प्रशासनाने तातडीने १ लोकल आणि १ मेमू गाडी सुरक्षितपणे बाहेर काढली आणि उर्वरित १ ईएमयू (EMU) गाडी घटनास्थळी बऱ्याच वेळ अडकून होती, तिला हलवण्यासाठी तातडीने डिझेल इंजिनची मदत घेण्यात आली. वसई रोड स्थानकावरून तांत्रिक तज्ज्ञांची टीम आणि विशेष टॉवर वॅगन घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर सुरू असलेल्या दुरुस्ती कामामुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्यात एक तासाची अवधी लागली,अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान ऐन सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत पश्चिम रेल्वेवरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. विरारपासून चर्चगेटकडे जाणाऱ्या स्थानकावरील फलाटांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.यामुळे लोकलची वाट पाहता पाहता प्रवाशांच्या नाकी नऊ आले. सोशल मीडिया आणि स्थानकांवर सतत उद्घोषणा करत प्रवाशांना सातत्याने माहिती दिली जात असली, तरी उशिरामुळे होणारी धावपळ थांबण्याचे नाव घेत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon