मुलुंड स्थानकात जलद लोकल पकडण्याच्या नादात एका व्यावसायिकाने आपला पाय गमावला; उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – धावत्या लोकलमधून पडून होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. आता काही दिवसांपूर्वीच मुलुंड रेल्वे स्थानकावर अशीच एक घटना घडली. एका व्यावसायिकाने धावत्या जलद लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात आपला एक पाय गमावला होता. त्यानंतर शनिवारी उपचारादरम्यान या व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुलुंड रेल्वे स्थानकावर ९ एप्रिल रोजी ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्यावसायिकाचे नाव किर्ती विरा असून ते ७१ वर्षांचे होते. मुलुंड पश्चिमेतील ते रहिवासी होते. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये ते काही वस्तू विकायचे. ९ एप्रिल रोजी, सायंकाळी ५.३० च्या सुमारास ते प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून जलद लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी लोकलखाली येऊन ते गंभीर जखमी झाले. मुलुंड रेल्वे स्थानकावर जलद लोकलची वारंवारता कमी असल्यामुळे त्यांनी ही धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला.
ट्रेन खाली येताच ते ट्रेनसोबत काही अंतरावर ओढले गेले. त्यावेळी त्यांच्या एक पाय गुडघ्यापासून वेगळा झाला. त्यांनी तातडीने अगरवाल रुग्णालयात भरती करण्यात आले. नंतर त्यांना मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
नेहमी सायंकाळी ४ वाजता मशीद बंदरसाठी मुलुंडहून निघणाऱ्या किर्ती विरा यांना गुरूवारी उशीर झाला होता. त्या दिवशी त्यांना अचानक झोप लागल्यामुळे ते घरातून ५ नंतर निघाले. उशीर झाल्यामुळे ते ठाण्यावरून सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना फर्सट क्लासच्या डब्यामध्ये चढायचे होते. परंतु, लोकल हलू लागल्याने त्यांनी जनरल डब्यात चढण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी ते फलाटावरून थेट ट्रेन खाली खेचले गेले.
काही दिवस त्यांच्यावर अगरवाल रुग्णालयात उपचार केल्यानंतर कुटूंबियांनी त्यांना फोर्टीस रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी त्यांना रुग्णवाहिकेतून फोर्टीस येथे घेऊन जाण्यात येत होते. परंतु, याचवेळी त्यांची प्रकृती अचानक खालावली. शनिवारी सायंकाळी ६.२३च्या दरम्यान रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विरा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.