कल्याणमध्ये वाहनचोरीचा पर्दाफाश : कोळसेवाडी पोलिसांची कारवाई; सराईत आरोपीसह अल्पवयीन ताब्यात, १० दुचाकी जप्त

Spread the love

कल्याणमध्ये वाहनचोरीचा पर्दाफाश : कोळसेवाडी पोलिसांची कारवाई; सराईत आरोपीसह अल्पवयीन ताब्यात, १० दुचाकी जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : परिसरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळवले असून सराईत आरोपीसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे ३ लाख ५५ हजार रुपयांच्या १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल २०२६ रोजी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकासमोरील रॉयल रेसिडेन्सी परिसरात दोन संशयित व्यक्ती उभ्या असलेल्या वाहनांची पाहणी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी शुभम उर्फ शिवम संपत पठारे (वय २४, रा. उल्हासनगर) याला तसेच एका अल्पवयीन मुलाला पळून जाण्याच्या तयारीत असताना शिताफीने पकडले.

त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली ‘एक्सेस १२५’ स्कूटर जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत आरोपीकडून आणखी १० मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. या सर्व वाहने विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक आणि उल्हासनगर परिसरातून चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे वाहनचोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार दत्तू जाधव करत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon