अमरावती क्राइम ब्रांचचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : राजस्थानपर्यंत पोहोचत आंतरराष्ट्रीय एमडी ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड

Spread the love

अमरावती क्राइम ब्रांचचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : राजस्थानपर्यंत पोहोचत आंतरराष्ट्रीय एमडी ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड

पोलीस महानगर नेटवर्क

अमरावती : शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतून उघडकीस आलेल्या एमडी (मेफेड्रोन) तस्करी प्रकरणाचा तपास करत अमरावती क्राइम ब्रांचने थेट राजस्थानातील उत्पादन कारखान्यावर धाड टाकत आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कचा मोठा भंडाफोड केला. या कारवाईत मुख्य सूत्रधार मांगीलाल गनपत सिंघावत (वय ४५, डिंडवाना, राजस्थान) आणि त्याचा साथीदार विष्णु गायरी यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईची सुरुवात ८ मार्च रोजी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी अब्दुल फहीम आणि शेख अयान यांना २.७९ किलो एमडी ड्रग्ससह अटक केली होती. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तपासाची दिशा मुंबईतील मुख्य तस्कर अजीमकडे वळली. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत राजस्थानातील दुर्गम भागातील कारखान्यापर्यंत पोहोच साधली.

क्राइम ब्रांचच्या पथकाने गेल्या महिनाभरात सुमारे ४,००० किलोमीटरचा प्रवास करत गुप्तपणे तपास मोहीम राबवली. बीहड परिसर, दुर्गम भाग आणि अरुंद गल्लीबोळांमध्ये संशयितांचा पाठलाग करून अखेर मांगीलाल आणि विष्णु यांना जेरबंद करण्यात यश आले.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे देशभर पसरलेल्या ड्रग्स माफियांच्या जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त शिवानी बचाटे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी केले. भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon