“पैशांचा पाऊस” आमिष ठरलं महागात; भोंदूबाबा मिलिंद जाधवला ४ वर्षांची सक्तमजुरी
पोलीस महानगर नेटवर्क
बारामती : महिलांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी बारामती न्यायालयाने भोंदूबाबा मिलिंद जाधव याला दोषी ठरवत चार वर्षांची सक्तमजुरी व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी हा निकाल दिला.
तपासात उघड झाल्यानुसार, आरोपी मिलिंद जाधव महिलांना “पैशांचा पाऊस पाडतो” असे आमिष दाखवत त्यांना अघोरी पूजेत सहभागी करून घेत असे. या पूजेच्या नावाखाली त्यांच्याशी अनुचित वर्तन करून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. याशिवाय, महिलांची आर्थिक फसवणूकही केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर न्यायालयाने जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा प्रकारच्या भोंदूगिरीविरोधात कडक संदेश गेला आहे.