डोंबिवलीत फेरीवाला कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्यावर धक्काबुक्की; रामनगर पोलिसांत गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : पूर्व रेल्वे स्थानक परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या फेरीवाला मुक्ती मोहिमेला यश मिळत असतानाच कारवाईदरम्यान पालिका कर्मचाऱ्यावर दमदाटी व धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ग व फ प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई तीव्र केली आहे. नियमबाह्यरीत्या व्यवसाय करणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्याची मोहीम सातत्याने राबवली जात आहे.
दरम्यान, एका कारवाईवेळी फेरीवाल्याचे सामान जप्त करत असताना संबंधिताने संताप व्यक्त करत पालिका कर्मचाऱ्याशी वाद घातला. यावेळी शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली तसेच मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी अतिक्रमण नियंत्रण विभागातील कंत्राटी पर्यवेक्षक धीरज भरत अंकुशे (वय ३१) यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.