पंजाबमध्ये रिक्षाचालकाशी प्रेमसंबंध; ठाण्यातील व्यावसायिकाची पत्नी ३.३० लाखांचा ऐवज घेऊन फरार
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : पर्यटनाच्या निमित्ताने झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधात रूपांतरित होऊन एका कुटुंबाच्या संसाराला तडा गेल्याची धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. पंजाबमधील रिक्षाचालकाशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर ठाण्यातील एका व्यावसायिकाची पत्नी मुलगा व आईसह घर सोडून गेल्याचे समोर आले आहे. जाताना तिने घरातील सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचा ऐवजही सोबत नेल्याचा आरोप असून, याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढोकाळी परिसरात राहणारे ४५ वर्षीय तक्रारदार कपड्यांच्या ट्रेडिंगसह रिअल इस्टेट व्यवसाय करतात. डिसेंबर २०२३ मध्ये ते पत्नी, मुलगा आणि सासूसह अमृतसर येथे पर्यटनासाठी गेले होते. या दरम्यान त्यांची ओळख स्थानिक रिक्षाचालक हरविंदर सिंग याच्याशी झाली होती. सहल संपल्यानंतर कुटुंब ठाण्यात परतले आणि काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते.
मात्र, १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी पत्नी, मुलगा आणि सासू घरात नसल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला त्यांनी कापुरबावडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली होती. पोलिस तपासादरम्यान संबंधित महिला अमृतसर येथे हरविंदर सिंग याच्यासोबत स्वेच्छेने राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ‘मिसिंग’ची नोंद बंद करण्यात आली.
दरम्यान, अमृतसरहून परतल्यानंतर तक्रारदारांनी घरातील कपाटाची तपासणी केली असता चोरी झाल्याचे उघड झाले. घरातून १.३० लाख रुपये रोख, सुमारे ७५ हजारांची सोन्याची साखळी, २५ हजारांची अंगठी आणि अंदाजे १ लाख रुपये किमतीचे रेडिमेड कपडे असा एकूण ३.३० लाख रुपयांचा ऐवज गायब असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या तक्रारीनंतर कापुरबावडी पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणातील कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा सखोल तपास करत आहे. पर्यटनातून सुरू झालेली ओळख एका कुटुंबासाठी इतकी घातक ठरेल, याची कल्पनाही तक्रारदारांना नव्हती.