उद्धव–आदित्य यांची संघटनात्मक मोर्चेबांधणी; १-२ एप्रिलला संपर्कप्रमुखांची विशेष बैठक

Spread the love

उद्धव–आदित्य यांची संघटनात्मक मोर्चेबांधणी; १-२ एप्रिलला संपर्कप्रमुखांची विशेष बैठक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखली असून १ आणि २ एप्रिल रोजी राज्यभरातील संपर्कप्रमुखांची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत आगामी आव्हानांना सामोरे जाण्याची दिशा ठरवली जाणार आहे.

या बैठकीचे नियोजन दोन टप्प्यांत करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी पश्चिम व पूर्व विदर्भ तसेच मराठवाड्यातील जिल्हा संपर्कप्रमुखांसोबत चर्चा होणार असून, २ एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर प्रथमच दोन्ही नेते एकत्रितपणे राज्यव्यापी संघटनात्मक आढावा घेणार असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पक्षाने नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. मुंबईतील पहिल्या टर्ममधील नगरसेवकांवर विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या अंतर्गत ठाणे जिल्ह्याची जबाबदारी धर्मेंद्र काळे यांच्याकडे देण्यात आली असून नाशिकसाठी सुहास वाडकर, नागपूरसाठी किरण तावडे, वर्ध्यासाठी सचिन पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पालघर, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार, जळगाव आदी जिल्ह्यांसाठीही स्वतंत्र निरीक्षक नेमण्यात आले आहेत.

पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांसाठी भक्कम पायाभरणी करणे, या उद्देशाने ही मोहीम राबवली जात असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon