पार्थ पवार अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, अजितदादांच्या मुलाशी मनसेप्रमुखांची दीड तास गहन चर्चा; भेटीचे कारण गुलदस्त्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे युवा नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
पार्थ पवार सोमवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. त्यामुळे या भेटीचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि त्याभोवती असलेले संशयाचे धुके या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरे यांनीही या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच मुद्द्यावर कुटुंबाची बाजू मांडण्यासाठी पार्थ यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आहे.
नुकतेच पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले होते, ज्यावर राज ठाकरेंनी ‘मराठी पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा’ अशी कडक भूमिका घेतली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या घडामोडींनंतर पवार कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही भेट असू शकते.
याच सर्व राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट अधिक महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली? याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी आगामी राजकारणात या भेटीचे परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.